The Game Of Time ..! | काळाचा खेळ हा न्यारा..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

The Game Of Time ..! | काळाचा खेळ हा न्यारा..!

image
ठळक मुद्दे काळाचा महिमा भलताच विचित्र आहे राव ! तो सतत बदलत असतो बदल कधी घडतो हे कळायच्या आत बरंच काही बदललेलं असतं अन् महत्त्वाच्या वेळाही निघून गेलेल्या असतात कधी जुनं ते सोनं असं म्हणायचं तर कधी ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी…’ असंही म्हणायचं!
काळाचा महिमा भलताच विचित्र आहे राव ! तो सतत बदलत असतो. या काळाबरोबर बाकीचं सारं काही बदलतच राहतं, हा बदल कधी घडतो हे कळायच्या आत बरंच काही बदललेलं असतं अन् महत्त्वाच्या वेळाही निघून गेलेल्या असतात अन् मग कधी जुनं ते सोनं असं म्हणायचं तर कधी ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी…’ असंही म्हणायचं! हा काळ बदलत असला तरी प्रत्येकाचा एक काळ असतो हे मात्र नाकारता येत नाही. हा काळ संपला की माणूस प्रकाशाच्या झोतातून अंधाराच्या दिशेनं वाटचाल सुरु करतो, पुढे पुढे तर त्याची ओळखही अदृश्य होते़ या दुनियादारीत. नवी पिढी, नवा विचार अन् नवी ओळख. हे चक्र तर कधी थांबलं नाही ना! फारसं नाव नसलेल्या नटनट्यांनाही पाहण्यासाठी लोक गर्दी करतात, नामांकित कलावंतांना तर अशा गर्दीपासून दूर रहावंच लागतं. पण काळ कधीतरी यांची ही ओळख लिलया पुसून टाकतो. अशीच असते दुनियादारी !
‘पंढरीची वारी या चित्रपटाचे चित्रीकरण पंढरीत सुरू होतं. अशोक सराफ, बाळ धुरी, जयश्री गडकर, राजा गोसावी, दीनानाथ टाकळकर असे दिग्गज नट या चित्रपटात काम करीत होते. मराठी चित्रपट अन् नाट्यसृष्टीतले त्याकाळचे सुपरस्टार अभिनेते राजा गोसावी त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून मी त्यांच्याकडे जात होतो पण वेळेचा काही मेळ बसत नव्हता. शेवटी त्यांनीच ठरवले शेवटच्या दिवशी मधुकरदादा टोमके यांच्या घरीच गप्पा मारू या. कलात्मक आविष्काराचे छायाचित्रकार मधुकरदादा म्हणजे त्यांचे जवळचे नातेवाईक अन् कलावंतही. मुलाखतीसह जेवणही उरकलं.
राजा गोसावी एसटीनं पुण्याला निघणार होते. एवढा मोठा नट अशा गर्दीतून प्रवास करणार म्हटल्यावर साहजिकच माझ्यासाठी धक्कादायक होतं. चाहत्यांच्या गर्दीचा त्रास होईल हे उघड होतं पण राजाभाऊ म्हणाले, काही नाही हो, कोण ओळखत नाही मला आता! त्यांचं हे बोलणं मला काही पटलं नाही. तरीपण ते म्हणाले ‘चला माझ्याबरोबर स्टँडबर, कळेल तुम्हाला. त्यांच्यासोबत मी पंढरपूरच्या बसस्थानकावर गेलो. खचाखच भरलेली बस फलाटावर उभीच होती. बसमधील गर्दीतून राजा गोसावी आपल्या आरक्षित जागेपर्यंत पोहोचले. आश्चर्य म्हणजे, एकाही प्रवाशानं या मराठी सुपरस्टारला ओळखलं नाही. राजाभाऊ खिडकीतून मिश्किलपणे हसत म्हणाले, काय ? पटलं ना आता ?ह्ण मी फक्त पहात राहिलो त्यांच्याकडे अशीही असते राव दुनियादारी!
पुढे काही वर्षांनी सोलापूरला हुतात्मा स्मारक मंदिरात आमच्या ‘चांदणे शिंपीत जा’ या नाटकाचा प्रयोग होता. पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापनदिनानिमित्त दै. दर्पणह्ण ने आयोजित केलेल्या या प्रयोगाला राजा गोसावी हजर होते. आधीच येऊन ग्रीनरुममध्ये आमच्यासोबत रमले होते. जुन्या घटनेबाबत मी त्यांना आठवण करून दिली तेव्हा तर त्यांनी एक धम्माल किस्सा सांगितला. ते म्हणाले, ज्यावेळी माझा ऐन भराचा काळ होता तेव्हा तर एका वाहकानं मला दरवाजातूनच बाहेर ढकलून दिलं होतं, खेड्यातल्या एका नाट्यप्रयोगासाठी निघालो होतो आणि ती शेवटची एकच बस होती. मी खाली पडलो अन् बस निघून गेली. सुदैवानं तिथला नियंत्रक माझा चाहताच होता, त्यामुळे त्यांनी एका खासगी वाहनानं जाण्याची माझी सोय केली होती’ असं सांगून राजा गोसावी जरा रेल्वे स्टेशनकडून फेरफटका मारून येतो, तुमचं चालू द्या’ असं म्हणाले तेव्हाही मी म्हणालो सोलापुरात तरी नक्की ओळखणार लोक तुम्हाला. ते हसले आणि निघून गेले. पायी चालत ते सोलापूरच्या रस्त्यावरून फिरुन आले पण एकानेही त्यांना ओळखलं नाही! मराठीतला एकेकाळचा सुपरस्टार पण —! कालाय तस्मै नम :
नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर, एकेकाळचं कलाक्षेत्रातलं वजनदार नाव. जेऊरच्या भारत हायस्कूलमध्ये शिकत असताना ‘एकच प्यालाह्ण हे नाटक बसवलं होतं. या नाटकात मी एक भूमिका करीत होतो. दरम्यान, सोलापूरच्या दमाणी सभागृहात कोल्हटकर, शरद तळवलकर यांच्या भूमिका असणारं ‘एकच प्याला’ या नाटकाचा प्रयोग लागला. आमच्या कलावंत शिक्षकांसह मी हा प्रयोग पाहिला. या प्रयोगापेक्षाही आपण किती मोठ्या नटांना जवळून पाहतोय याचाच आनंद अधिक होता.
चित्तरंजन कोल्हटकर, म्हणजे बापू हे चित्रपट आणि नाटकातील जबरदस्त आसामी! हा बदलता काळ कसा असतो बघा, ‘ब्रह्मचैतन्यह्ण या दूरदर्शन मालिकेत मला भूमिका मिळाली, तशी मालिकातून भूमिका करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी समजलं, चित्तरंजन कोल्हटकर यांच्यासोबत माझे सीन आहेत. मालिकेत पहिल्यांदाच काम करतोय यापेक्षाही चक्क बापूसोबत आपण छोट्या पडद्यावर अभिनय करणार आहोत याचं कुतूहल प्रचंड होतं. बापू माझ्याआधीच चित्रीकरणासाठी सज्ज झालेले होते. मी मेकअप करता करता खिडकीतून बापूंना सारखं न्याहाळत होतो. एवढ्या मोठ्या नटासोबत आपण काम करणार आहोत याचं अपु्रप काही वेगळंच होतं. चित्तरंजन बापू म्हणजे बाप माणूस हो।
काळ बदलतो तशी पिढीही बदलत जाते. नवनवे चेहरे समोर आलेले असतात अन् ते परिचितही झालेले असतात. त्या त्या पिढीला त्यांचं आकर्षण असतं, साहजिकही आहे म्हणा, त्यालाच तर म्हणायचं ना काळाचा महिमा सेटवर बरीच हौशी मंडळीही बघे बनून आलेली होती. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याकडे न्याहाळून बघत होते पण कोल्हटकरांसारख्या प्रसिद्ध नटाकडे कटाक्षही टाकला जात नव्हता. एका बघ्यानं तर मलाच विचारलं, ते म्हातारं कोण आहे हो? चांगलं काम करतंय त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे शब्द नव्हते. काळाचा खेळ हा न्यारा…
-अशोक गोडगे
(लेखक हे साहित्यिक आहेत)
Web Title: The game of time ..!

2018-12-26 19:45:29

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Do NOT follow this link or you will be banned from the site!