३ हजार ९०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाख निधीची तरतूद


मुंबई, दि. २५ : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशय/ नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

१०१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १७ योजनांसाठी एकूण ३,९०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी २ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

योजनांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपसा सिंचन योजनांच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्यामुळेच उपसा सिंचन योजनांची क्षेत्रीय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, मांडवे, बिरेवाडी, खरशिंदे, साकुर, वरवंडी, पेमगिरी, शिरापूर, डिग्रस, पारेगाव खु. व बु., तिगाव, काकडवाडी, करुले, क-हे, निमोन, व सोनोशी या १७ गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. २५१  ते ६००  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १८००  हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी ९६ लाख ९८  हजार १४१  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १०१ ते २५०  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २१०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी १ कोटी ४०  लाख ३३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वेक्षणानंतर प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्र, नदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिका वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/25.5.22Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Comments (0)
Add Comment