नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा


नंदुरबार, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नागरिकांचे होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून त्याचा लाभ पात्र लाभार्थींना द्यावा, असे निर्देश रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज सकाळी रोहयो आढावा बैठकीचे आयोजन श्री. नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रदीप कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, ‘रोहयो’चे राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे आदी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले की, नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने इतर जिल्ह्यांपेक्षा या जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. येथील नागरिकांचे स्थलांतर कायमस्वरूपी रोखण्यासाठी रोहयोच्या माध्यमातून गावातच त्यांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा. याकरीता कृषी, वने, जलसंपदा, पशुसंवर्धन तसेच इतर विभागांची मदत घेवून नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक जॉबकार्ड धारकांला गोठा, शेळीपालन, कुक्कूटपालन यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यात यावा. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून त्याचा अधिकाधिक उपयोग पिकांसाठी घेता येईल याकडे लक्ष द्यावेत. रोजगार निर्मितीबरोबरच पाणीपातळी, मातीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जमिनीची पाणीपातळी वाढविण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे द्यावीत. त्याचबरोबर कुरण विकासाकडे अधिक लक्ष देण्यात यावेत. रोजगार हमी योजनेच्या मनुष्यदिवस निर्मितीबरोबर लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढीवर भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक गाव समृद्ध होण्यासाठी गावातील प्रत्येक पात्र कुटूबांला रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळायला हवा. यासाठी गावपातळीवर नियोजन करावे. वैयक्तिक लाभाच्या योजना अधिकाधिक व्यक्तींपर्यत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये चर्चासत्रे, मेळावे घेण्यात येवून ग्रामस्थांना योजनांची माहिती देण्यात यावी. रोजगाराची मागणी करणाऱ्यांना त्वरीत कामे उपलब्ध करून द्यावी. सर्व विभागानी एकत्र येऊन जिल्ह्यात दर्जेदार कामे होतील त्यादृष्टीने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी यासह वने, कृषी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Comments (0)
Add Comment