Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

शेतकरी महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन त्यांना मानसन्मान मिळवून द्यावा : कृषिमंत्री दादाजी भुसे


मालेगाव, दि. 16 (उमाका वृत्तसेवा) :- राज्यात शेतीवर काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. शेती उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठेत स्थान निर्माण करून महिलांना शेतकरी उद्योजक म्हणून काम करताना त्यांना मानसन्मान मिळवून द्यावा, असे आवाहन कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री  दादाजी भुसे यांनी केले.

 

दाभाडी येथे श्रीमती भावना निळकंठ निकम यांच्या शेतावर राष्ट्रीय महिला किसान दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, आकाशवाणी केंद्राचे नानासाहेब पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह परिसरातील महिला शेतकरी, मान्यवर व कृषी विभगाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महिला किसान दिनानिमित्त शेतकरी महिलांना शुभेच्छा देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, सशक्त महिला सशक्त भारत ही संकल्पना देशात व राज्यात राबविण्यात येत आहे. आज महिला शेतकरी काबाडकष्ट करत असुन त्यांना पैशांची बचत करणे, आर्थिक व्यवहार करणे, भाजीपाल्याची स्वच्छता व प्रतवारी करुन बाजारात पाठविणे, मुल्यवर्धन करणे आदी कामे सर्वदूर महिला शेतकरी करत आहेत, मात्र अजुनही आपल्या देशात हवा तसा मानसन्मानासह नवीन कृषि तंत्रज्ञान महिला शेतकरी भगिनींना मिळत नाही. शेतकरी महिला दिवसभर मजुरी करतात मात्र नवनवीन आलेले कृषि तंत्रज्ञान, आधुनिकीकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागामार्फत महिलांच्या शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. या शेती शाळेत ज्या महिला  येतात आज त्यांना विवीध तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्याचा वापर केल्याने त्यांचे शेती उत्पादनात निश्चीतच भर पडली आहे. त्याचबरोबर महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरुन नवीन योजना प्रस्तावित असून मंजुरीनंतर लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

 

मंत्री श्री.भुसे म्हणाले, शासनामार्फत शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे मिळणेकरिता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका करिता शासनामार्फत अनुदान देण्यात येणार असुन त्यात प्राधान्याने महिला कृषी पदवीधर यांना लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सागितले. त्याचबरोबर महिला शेतकरी वर्गासाठी विद्युत पुरवठा दिवसा करणेबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कृषि विभागाच्या योजनांमध्ये शेतकरी महिलांना प्राधान्य दिले जाणार असुन यात महिलांच्या क्षेत्रीय भेटी, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, चर्चासत्राचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर ग्रामीण भागात श्रीमती राहीबाई पोपरे अकोले यांचे परंपरागत बियाणे बँकेचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सर्व महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन भविष्यात जुन्या वाणांची जपणूक करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

प्रारंभी राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करुन ज्येष्ठ महिला शेतकरी यांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले त्यांनतर श्रीमती भावना निळकंठ निकम, श्रीमती कासुबाई कृष्णा जाधव, श्रीमती हिराबाई खुशाल निकम, श्रीमती सुषमा सुभाष निकम या महिलांचा कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कृषी विभागाच्या गितांजली लकारे, दिप्ती तवर यांनी कृषी विषयी योजनांची माहिती दिली, ज्येष्ठ शेतकरी महिलांनी  शेती व्यवसाय व कुटुंब व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून शेतीविषयक अनुभव सांगितले. कार्यक्रमानंतर  कृषि महोदयांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय महिला किसान दिनानिमित्त कार्यक्रमात महिलांचे राज्यातील युट्युबच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा विसापुरकर कृषि सहायक यांनी केले. उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0000Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Do NOT follow this link or you will be banned from the site!