Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दिनांक: 06 (जिमाका वृत्तसेवा) – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळून सर्व शाळा सोमवार 10 ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवून, दुसरा डोस घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्‍डेय, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी. एस. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता बंद करण्यात आलेल्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यास हरकत नाही, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत घेण्यात आलेला निर्णय पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी जाहिर केला. तसेच ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करण्यात यावे. तसेच समांरभामध्ये  50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पहिला डोस  घेतलेल्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस वेळेत घ्यावा. अन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असेही  पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी  सांगितले.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यात्रांवर बंदी राहिल. तसेच धार्मिक स्थळांमध्ये कोरोनाच्या सर्वं नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तेथील पुजारी, विश्वस्त यांची असेल. सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, याबाबतची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा धोका वाढू नये यासाठी स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्ह्याची कोरोना सद्यस्थितीची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. यामध्ये दरदिवसाला साधारण 30 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच साधारण 9 लाख लस जिल्ह्यात शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आजच्या स्थितीला मालेगावमध्ये 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस तर 42 टक्के नागकिांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 600 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात आली असून, पुरेश्या प्रमाणात बेड्स व औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मालेगावमधील कोरोना रुग्णांची  संख्या अत्यल्प असल्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत अभ्यास गट गठित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिली.

बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांना सादर केली.

Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.