Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

राज्य शासनाचे काम लोकाभिमुख – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


शिर्डी,  दि.25 (उमाका वृत्तसेवा) – राज्य शासन लोकाभिमुख होऊन काम करत आहे. सर्वसामान्यांना घरे, रस्ते व दर्जेदार शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून भरीव काम झाले आहे. संगमनेर शहरात शासनाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. यातून टिकाऊ व दर्जेदार काम उभी  झाली आहेत. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज  केले.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने, विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व रमाई उद्यानाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व गृह राज्यमंत्री  सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत राज्य मार्ग क्र 50 वरील संगमनेर ते समनापूर रस्ता चौपदरी व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद प्रांगणासमोर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, उद्योजक डॉ. संजय मालपाणी,  सत्यजीत तांबे, राजहंस चेअरमन रणजित देशमुख, कारखाना संचालक इंद्रजीत थोरात़, उपनगराध्यक्ष अरिफ देशमुख, मुख्याधिकारी राहूल वाघ तसेच सर्व विभागाचे सभापती व सर्व नगरसेवक, नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.थोरात  म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे. या  सर्व  कामांसाठी नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे. संगमनेर शहरात वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या असून पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न येथे सुटला आहे. भौतिक सुविधांबरोबर आंतरिक शांतता असलेले  संगमनेर शहर असून येथे बंधुभाव  नांदतो आहे.  संस्कृत राजकारणाची परंपरा येथे कायम जपली असून पुढील पिढीने ती जपावी.असे त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा  गायकवाड म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समाजकारणाची परंपरा बाळासाहेब थोरात यांनी जपली असून गोरगरिबांच्या जीवनात सर्वांगीण आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल ठरले आहेत. श्री थोरात यांनी शहराला कुटूंब समजून  काम केले आहे. संगमनेर नगरपरिषदमधील स्वच्छता वाखाण्याजोगी आहे. आज शहारातील 31 बगिच्यांच एकाचवेळी उद्घाटन झाले ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे.

गृहराज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, संगमनेर तालुका हा राज्यात सर्वात जास्त शेततळे असलेला तालुका ठरला आहे. राज्यात अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे कामे करताना शासनाने कधीही कामाचा गवगवा केला नाही मात्र शाश्वत कामे केली. बाळासाहेब थोरात  एक सर्वात समजदार व समन्वयकाची भूमिका पार पाडणारे  महत्त्वाचे मंत्री आहेत.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, शासनाच्या व येथील नेतृत्वाच्या माध्यमातून नगरपालिका अत्यंत चांगले काम केले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठमोठे पुरस्कार मिळवले आहेत. संकट काळात बाळासाहेब थोरात यांनी नगरपालिकेला  मोठा निधी मिळवून दिला. या शासनाच्या  काळात  निळंवडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली असून हे काम पुढील वर्षात पूर्ण होणार आहे.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ.संजय मालपाणी यांची यावेळी भाषणे झाली.  विश्वासराव मुर्तडक , दिलीपराव पुंड , सौ शरयूताई देशमुख , डॉ.जयश्री थोरात, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, आबासाहेब थोरात, कपील पवार, अमर कतारी, सौ.मीराताई शेटे, सौ सुनंदाताई जोर्वेकर आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.