Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार


जळगाव, (जिमाका) दि-. 27 – कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे म्हणून काम करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याचे माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली.

 

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंत्री ॲड ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील आमदार शिरीष चौधरी ,आमदार लताताई सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती ज्योतीताई पाटील, जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, विभागीय उपायुक्त चंद्रकांत पगारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मंत्री ॲड ठाकूर पुढे म्हणाल्या की, बालकांचे संरक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करणे आवश्यक आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण केंद्र स्थापन करावे. प्रत्येक गावात सुसज्ज अशा अंगणवाड्या असाव्यात याकरीता जिल्हा परिषदेच्या सेस व जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावेत. तसेच याठिकाणी मुलांना पिण्याचे स्वच्छ पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वेळेवर दिले पाहिजे. जिल्ह्यातील महिला व बालकांचा विकास व्हावा, त्यांचे संरक्षण व्हावे याकरीता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. त्याकरीता तातडीने जागा उपलब्ध करुन घ्यावी.  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून 3 टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागास मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य पध्दतीने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  जिल्ह्यात जास्तीत जास्त अंगणवाड्या आयएसओ मानांकित करण्यात याव्यात तसेच स्मार्ट अंगणवाड्याची संख्या वाढवावी. महिलांच्या संरक्षणास व समुपदेशनास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागास दिले.

यावेळी मंत्री ॲड ठाकूर यांनी महिला अत्याचाराच्या घटना, कुमारी मातांचे प्रमाण, मुलींचे गुणोत्तर, पीसीपीएनडीसी कायदा, पुरक पोषण आहार योजना, कुपोषित बालकांचे प्रमाण, माझी कन्या भाग्यश्री योजना, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एकरक्कमी लाभ प्रकरणे, अंगणवाडी इमारत बांधकामाची स्थिती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आदिंचा आढावा घेतला.

 

जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी श्री. आर. आर. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी विभागाचा आढावा सादर केला.

 

यावेळी मंत्री ॲड ठाकूर यांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल डॉल’ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे, अनाथ मुलांना प्रमाणपत्राचे, तेजस्वी फायनान्स कार्यक्रमातंर्गत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांना मदतीचे धनादेशाचे वितरण प्रातिनिधीतक स्वरुपात करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिसमिल्ला स्वयंसहाय्यता बचत गट, मेहरुण, धनलक्षमी महिला बचत गट, बांभोरी यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित होऊन चार अंगणवाडी सेविकांच्या मृत्यू झाला. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

 

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थ्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Do NOT follow this link or you will be banned from the site!