Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

 

या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत  आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विविध पुरस्काराचे वितरण

गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खाजगी रुग्णालयांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन-2019 करीता 31 लाख 30 हजार इतका इष्टांक नंदुरबार जिल्ह्याने वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल  देण्यात येणारा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील सुभेदार रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्यामार्फत सीएसआर निधीतून घेण्यात आलेल्या 11 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापैकी 9 रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी आणि 2 जिल्हा रुग्णालयासाठी उपयोगात येणार आहेत. ग्रामीण  भागातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल असा विश्वास यावेळी ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला.

 

 

पोलीस वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते 13 पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वाहनांसाठी 90 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पोलीसांना वाहन प्राप्त झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. पोलीस दलासाठी आवश्यकतेनुसार आणखी वाहने देण्यात येतील असे ॲड.पाडवी यांनी यावेळी सांगितले.

रक्तपेढी इमारतीचे उद्घाटन

ॲड.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय परिसरातील रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. ही  इमारत सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आणि रक्त परिक्षणासाठी रक्तपेढी आदिवासी भागासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांनी रक्तपेढीतील विविध सुविधांची माहिती घेतली.

मोबाईल बँकेचे उद्घाटन

दुर्गम भागातील बँकींग व्यहवार सुरळीत व्हावे आणि नागरिकांना गावातच बँकेची सुविधा मिळावी यासाठी नाबार्डच्या एफआयएफ निधीतून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी देण्यात आलेल्या  दोन मोबाईल  एटीएम वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री  ॲड.पाडवी यांनी केले. या सुविधेमुळे गरीब आदिवासी बांधवांचा शहरात येण्याचा खर्च वाचेल आणि बँकेच्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय येाजनांचा लाभ घेता येईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, तीन एकलव्य निवासी शाळांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे आश्रमशाळा इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात येत आहे. वर्ग खोल्यांची दुरुस्ती आणि नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या काळात प्रत्येक शासकीय शाळेला स्वत:ची इमारत असावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दुर्गम भागातील आश्रमशाळांच्या कामकाजावर टेक्नॉलॉजी निरीक्षण ॲपद्वारे प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी सोईचे व्हावे यासाठी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. आदिवासी युवकांमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक चिकाटी आणि क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करून ते म्हणाले, कोरोना काळात जिल्ह्यात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने चांगले प्रयत्न केले आहेत. कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका अद्यापही असल्याने नागरिकांनी शारिरीक अंतर, मास्क घालणे आणि स्वच्छ हात धुणे या त्रिसुत्रीचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गतही  चांगले काम झाले आहे. दुर्गम भागासाठी मोबाईल एटीएम सुरू करण्यात येत आहे. कुपोषणाची समस्या दूर करताना रोजगार निर्मितीलाही चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भगर प्रक्रीया उद्योगाला प्रोत्साहन देणार असून केंद्र सरकारने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड केली आहे.  या योजनेत भगर व त्यावर आधारीत उत्पादनाचा समावेश असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

 

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

NasikNews.in