Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण


अहमदनगर, दि. 26-  जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने सर्वांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  गेले जवळपास वर्षभर आपण कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहोत. कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आपण कोरोनाला हरवण्याची लढाई सुरु केली आहे. मात्र, ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना आपण शेतकर्‍यांना बळ दिले. जिल्ह्यातील 2 लाख 84 हजार 868 शेतक-यांना 1 हजार 727 कोटी रुपये कर्जमुक्तीचा लाभ  मिळाला. मागील खरीप हंगामात शेतक-यांना 3 हजार 123 कोटी  रुपयांचे कर्जवाटप केले. यावर्षी अधिकाधिक आणि वेळेवर कर्ज वाटप करण्‍याच्‍या सुचना बँकांना दिल्‍या आहेत. अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतक-यांना 228 कोटीहून अधिक अनुदान वितरित करण्यात आल्याचे ते म्हणाले. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एकूण 1400 ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात काही भागात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मात्र, प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने तात्काळ आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत. पोल्ट्री व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारे शेतकरी अडचणीत येणार नाहीत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याशिवाय राज्‍य शासनाने कृषीपंप वीज जोडणी धोरण – 2020 जाहीर केले आहे. शेतक-यांनी त्‍याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व ओळखून येथील स्थळांचे संरक्षण आणि संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. सन 2020-21 या नियोजन आराखड्यात विकासकामांसाठी 671 कोटी रूपये उपलब्‍ध करुन दिले आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरावरुन अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वारही त्यांनी दिली.

जिल्ह्यात शिवभोजन योजनेच्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये 9 लाख 50 हजाराहून शिवभोजन थाळ्यांच्या माध्यमातून अनेक गरीब आणि गरजूंना आधार मिळाला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. शिधापत्रिकांचे संगणकीकरण केल्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य पुरवठा करणे सुलभ झाला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

गाव विकासासाठी कै. आर.आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना, स्थानिक स्वराज्य संस्था बळकटीकरणासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनाही देणे, ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करुन महाआवास योजना-ग्रामीण राबविणे, देशासाठी लढणा-या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून आजी-माजी सैनिकांना मालमत्ता करातून सवलत, दिनांक 06 जून हा दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतक-यांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेत जनावरांसाठी गोठा बांधकाम, शेळीपालन शेड बांधकाम, रस्ता दुतर्फा लागवड, पाणंद रस्ते व इतर रस्ते, पोल्ट्री शेड, भूसंजीवनी नॅडेप कंपोस्टींग आदी कामे करता येणार आहेत. मनरेगा अंतर्गत राज्‍यातील ग्रामीण भागामध्‍ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्‍ते आणि इतर खडीकरणाचे रस्‍ते निर्मितीचा संकल्‍प आपण केला आहे. याशिवाय हरहर गोठे घरघर गोठे हा उपक्रम मनरेगा मधुन राबविण्‍यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मिशन बिगीन अगेन म्हणत आपण आता सर्व सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात विविध ठिकाणी आवश्यक असणारी कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचा लाभ निश्चितपणे सर्व जिल्हावासियांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. आतापर्यंत 11 हजार 874 लाभार्थ्यांना 76 कोटी 09 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले तर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 348 कोटी 32 लाख रुपयांचे अनुदान शेतक-यांच्‍या खात्यावर वर्ग केल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रासाठी 45 रूग्‍णवाहिका घेण्‍याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत असून नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस दलासाठी 20 नवीन वाहने घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार काशिनाथ खराडे, राजेंद्र सुपेकर चालक सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलिस हवालदार शैलेश उपासनी, मन्‍सुर सय्यद, कैलास सोनार, पोलिस हवालदार अजित पवार यांचा तर पोलीस निरीक्षक ज्‍योती गाडेकर यांचा उत्‍कृष्‍ट अपराधसिध्‍दीकरिता रुपये 7 हजार व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जिल्‍हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (उत्‍तर विभाग) या विभागातील कर्मचारी ए.आर ठाणगे यांचा कर्तव्‍य बजावतांना कोरोना संसर्गाने मृत्‍यू झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या वारसांना 50 लाख रुपयांचे विमा कवच आणि कोविड योध्‍दा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, युवक, महिला आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल बागुल यांनी केले.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

NasikNews.in