Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

कोरोनाकाळात आरोग्य कर्मी व पोलिसांचे योगदान उल्लेखनीय

नाशिक दि. 24 सप्टेंबर २०२१ (जिमाका वृत्तसेवा) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व पोलीस यंत्रणांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे, असे गौरोद्वगार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले आहे. आज चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, संजय जाधव आदींसह रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना साथरोगाची दुसरी लाट महाभयंकर होती. यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. या आजारातून बरे होणाऱ्या रूग्णांना म्युकरमायकोसिस सारख्या आराजाने ग्रासले. या लाटेत रूग्णसंख्या संपूर्ण राज्यात जास्त असल्याने ऑक्सिजन टंचाईचा ही सर्वांनाच सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 29 ‍ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लॉन्टची उभारणी होत असून, जिल्हा ऑक्सीजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, चांदवड तालुक्यात 9 हजार 455 रूग्ण बाधीत झाले होते त्यातील 9 हजार 88 रूग्ण बरे झाले तर 328 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सीजनची गरज लक्षात घेवून जिल्ह्यात सर्वच शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन जंबो सिंलेंडर, ऑक्सीजन ड्यूरा सिलेंडर्स, ऑक्सीजन कॉन्टेसर्स, लिक्वीड ऑक्सीजन सिंलेंडर्स यांची गरजेनुसार व्यवस्था आज करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशिल शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आज उद्घाटन झालेल्या पीएसए ऑक्सिजन प्लॉन्टची साठवणूक क्षमता पन्नास हजार लीटर असून, दिवसाला  50 ते 60 जंबो सिलेंडर याद्वारे भरली जाऊ शकतात. उपजिल्हा रूग्णालयात 33 जंबो सिलेंडर्स व 3 ड्यूरा सेल आजरोजी उपलब्ध आहे. आता ऑक्सीजन प्लॉन्ट कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला असून, वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून 50 जंबो सिंलेडर्सद्वारे रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करता येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, ऑक्सिजन जनरेशन प्लॉन्टच्या माध्यमातून आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा नक्कीच भासणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.

000

Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.