Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. ८ : नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केले.

 नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या  या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, मंजुळाताई गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले,जलतरण तलावाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे  या सुविधेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर  कामगिरी करणारे खेळाडू तयार करावेत. त्यासाठी  आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल.

आदर्श प्रशासकीय इमारत उभी करावी

नंदुरबार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनी युक्त आणि  इतरांसमोर आदर्श ठरेल अशी बनवावी. इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी इमारत बघण्यासाठी इथे यावेत. नगर परिषदेने शहारासाठी चांगल्या सुविधा तयार केल्या आहेत. ही शिरीषकुमारसारख्या  क्रांतीकारकांची भूमी आहे. इथल्या जनतेला सुविधा देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. अशा सुविधांच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

जनतेशी विश्वासाचे नाते

नंदुरबार शहरातील नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केल्याबद्दल नागरिकांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले, शासनाचे जनतेशी विश्वासाचे नाते तयार झाल्याने कोरोनासारख्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होते. विश्वासाच्या याच शिदोरीच्या बळावर राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेणे शक्य होईल.

जिल्हा प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणेने चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यात यश आले आहे. प्रशासनाच्या  प्रयत्नांना जनतेने दिलेली साध कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुबार नगर परिषदेने चांगली कामे केली असून ती  पाहण्यासाठी लवकरच शहराला भेट देऊ, असे श्री.ठाकरे म्हणाले.

नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी जलतरण तलावासारखी उत्तम सुविधा शहरात निर्माण  केल्याबद्दल नगर परिषदेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, आदिवासी भागातील शहरात अशा प्रकारच्या उत्तम सुविधा निर्माण होणे ही समाधानाची बाब आहे. नगर परिषद चांगले काम करीत असून शहर विकासाच्या प्रकल्पांना नगर विकास विभागामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल.

श्री.रघुवंशी म्हणाले, नंदुरबार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम इमारत असेल.  नगर परिषदेच्या माध्यमातून समतोल आणि वेगाने विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या सर्व योजना नगर परिषदेमार्फत राबविल्या जात  आहेत.

डॉ.भारुड म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबारच्या जनतेने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला सहकार्य केल्याने नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी ठेवण्यात नंदुरबार जिल्ह्याला यश आले. नंदुरबार  नगर परिषदेनेदेखील यासाठी चांगले सहाकार्य केले.

प्रास्ताविकात श्रीमती रघुवंशी यांनी नगर परिषदेतर्फे महिलांसाठी मॉ-बेटी उद्यान आणि जीम उभारण्यात येत असल्याचे सांगितले. जलतरण तलाव सर्व सुविधांनी युक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, नवापूर नगराध्यक्षा हेमलता पाटील, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, साक्री नगराध्यक्ष अरविंद भोसले, नंदुबार उपनगराध्यक्षा भारती राजपूत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Do NOT follow this link or you will be banned from the site!